वडणगेतील देवी पार्वती हायस्कूलमध्ये इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

करवीर  : नवप्रवाह मराठी 

 विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि संघटन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने वडणगे येथील देवी पार्वती हायस्कूलमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या वतीने इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या नवनिर्मित इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


डिस्ट्रिक्ट ३१७०च्या असिस्टंट गव्हर्नर सौ. अरूंधती महाडिक यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. इंटरॅक्ट प्रेसिडेंट म्हणून स्वरा विनोद पाटील, सेक्रेटरी म्हणून श्रेया संभाजी कापसे आणि ट्रेझरर म्हणून विदिशा संदीप बारले यांनी जबाबदारी स्वीकारली.

यावेळी सौ. अरूंधती महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आणि सक्षम नेतृत्व घडवणारे आधारस्तंभ असल्याचे सांगितले. इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेवाभावी विचारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष रोटेरियन प्रदीप भारमल, सचिव रोटेरियन अतुल भालेकर आणि खजिनदार रोटेरियन सचिन नंदगांवकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रदीप भारमल यांनी इंटरॅक्ट क्लबची कार्यपद्धती आणि उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन विविध सेवाभावी उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले.

इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी रोटरी क्लबकडून मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहे.

कार्यक्रमाला देवी पार्वती हायस्कूलचे अध्यक्ष तानाजी पाटील, उपाध्यक्ष रघुनाथ पाटील, सचिव विलासराव पवार, मुख्याध्यापक राजेश देपणे तसेच रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे सचिन परांजपे, विश्वजीत जाधव, संभाजी जाधव, राहुल राबाडे, प्रसन्न सरदेसाई आणि सिद्धार्थ डुणूंग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments