कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील चिन्ह वाटपावरून राजकीय वातावरण तापले आहे. राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळू न दिल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर केला आहे. सत्तेच्या दबावातून चिन्ह वाटपात हस्तक्षेप झाल्याचा दावा त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी चिन्ह वाटप करण्यात आले. या प्रक्रियेत राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळाले. मात्र, आघाडीने कपबशी या चिन्हासाठी सर्वप्रथम मागणी केली होती, असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे.
प्रथम अर्ज करूनही कपबशी चिन्ह मिळाले नाही?
सतेज पाटील यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २ मार्च २०२६ रोजीच्या परिपत्रकात एकाच चिन्हाची मागणी करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रथम अर्ज करणाऱ्याला प्राधान्य देण्याची तरतूद आहे. निवडून द्यावयाच्या एकूण जागांपैकी ३० टक्क्यांहून अधिक उमेदवारांनी गट तयार करून सामूहिक अर्ज केल्यास त्या गटाला एकच चिन्ह देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
समविचारी आघाडीने २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी कपबशी चिन्हासाठी अर्ज केल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी उर्वरित १५ उमेदवारांची नावे देऊन पुन्हा मागणी करण्यात आली. ९ ऑक्टोबर रोजी पहाटे १२ वाजून ३ मिनिटांनी २५ उमेदवारांच्या नावांसह अधिकृत ई-मेलद्वारे मागणी पाठविल्याचा आणि सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी छापील अर्ज सादर केल्याचा दावाही त्यांनी केला.
दूध उत्पादक समविचारी आघाडीच्या पाठीशी राहतील : सतेज पाटील
प्रथम मागणी करूनही कपबशी हे चिन्ह न मिळाल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत सतेज पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला. चिन्ह वाटपात सत्तेचा दबाव वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महायुतीने कपबशी हे चिन्ह मिळू दिले नसले, तरी दूध उत्पादकांच्या मनात समविचारी आघाडीची ओळख कायम असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. दूध उत्पादक समविचारी आघाडीच्या पाठीशी उभे राहतील, असा दावाही त्यांनी केला.
गोकुळ निवडणुकीतील चिन्ह वाटपावरून आता महायुती आणि राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

0 Comments