कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी कोल्हापुरातील विविध शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी देत शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या दौऱ्यात महावीर महाविद्यालय, नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय या संस्थांना भेट देण्यात आली. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.शिक्षकांवरील अडचणी, शिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक संस्थांचा विकास आणि भविष्यातील आव्हाने यावर या संवादात विचारविनिमय झाला. शिक्षकांचे प्रश्न केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यावर ठोस कार्यवाही होणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचा निर्धार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरातील या सदिच्छा भेटींमधून शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासोबतच त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यावर भर देण्यात आला. शिक्षकांचा सन्मान आणि शैक्षणिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आपल्या प्रयत्नांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.

0 Comments