डी. वाय. पाटीलच्या ७ संशोधकांचा जागतिक डंका!

 कोल्हापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक संशोधन निर्देशांक अर्थात ‘अकॅडमी रिसर्च इंडेक्स’ने जाहीर केलेल्या २०२६ च्या जागतिक टॉप-1000 संशोधकांच्या क्रमवारीत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसिप्लिन रिसर्चच्या सात संशोधकांनी स्थान मिळविले आहे. ‘एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस’ या विषयात डॉ. सी. डी. लोखंडे यांनी जागतिक क्रमवारीत २२ वे, तर भारतात प्रथम स्थान पटकावले आहे. विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी जागतिक क्रमवारीत २४ वे आणि भारतात तिसरे स्थान मिळविले आहे.


२०२१ ते २०२५ या प्रभाव कालावधीसाठी जाहीर करण्यात आलेल्या या क्रमवारीत डॉ. सी. डी. लोखंडे यांचा प्रभाव गुणांक ९९.३८ आहे. या कामगिरीमुळे त्यांचा जगातील अव्वल ०.२१ टक्के संशोधकांमध्ये समावेश झाला आहे.

प्रा. डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी ‘एनर्जी मटेरियल्स अँड डिव्हाइसेस’ या विषयात जागतिक स्तरावर २४ वे स्थान मिळविले असून भारतात ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा प्रभाव गुणांक ९७.८९ असून जगातील सर्वोच्च ०.४७ टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.

याच विषयात डॉ. उमाकांत एम. पाटील यांनी जागतिक क्रमवारीत ७६ वे, तर भारतात आठवे स्थान मिळविले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९४.२६ आहे.

विविध संशोधन क्षेत्रांतही उल्लेखनीय कामगिरी

डॉ. विश्वजीत एम. खोत यांनी ‘मॅग्नेटिक नॅनोपार्टिकल्सचे कॅरेक्टरायझेशन अँड ॲप्लिकेशन्स’ या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत ३२७ वे, तर भारतात ११ वे स्थान मिळविले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९५.२३ असून जगातील टॉप १.७ टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे.

डॉ. जयवंत एल. गुंजकर यांनी ‘लेअर्ड डबल हायड्रॉक्साइड्स सिंथेसिस अँड ॲप्लिकेशन्स’ या विषयात जागतिक क्रमवारीत ५५२ वे आणि भारतात २० वे स्थान मिळविले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ९२.८२ आहे.डॉ. अर्पिता तिवारी यांनी ‘कार्बन अँड क्वांटम डॉट्स ॲप्लिकेशन्स’ या विषयात जागतिक स्तरावर ५९४ वे, तर भारतात ५५ वे स्थान मिळविले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८८.१९ आहे.

डॉ. प्रवीण पी. पवार यांनी ‘रेडिएशन शिल्डिंग मटेरियल्स ॲनालिसिस’ या विषयात जागतिक क्रमवारीत ६११ वे, तर भारतात ७५ वे स्थान मिळविले आहे. त्यांचा प्रभाव गुणांक ८२.९१ आहे.

संशोधकांचा विद्यापीठात सन्मान

जागतिक क्रमवारीत स्थान मिळविणाऱ्या सर्व संशोधकांचा विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. पाटील यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले.

यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले आदी उपस्थित होते.

एनर्जी मटेरियल्स, सुपरकॅपॅसिटर्स, नॅनोमटेरियल्स, क्वांटम डॉट्स, रेडिएशन शिल्डिंग आणि प्रगत पदार्थ विज्ञान यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांत विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या यशामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावलौकिक वाढण्यासह आंतरविद्याशाखीय संशोधनाला आणखी चालना मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments