कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुमारे २६ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आनंदराव पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मानसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वखर्चातून तसेच ऐच्छिक निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये फुलेवाडी येथील पीएमश्री महात्मा फुले विद्यालय परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्ता, भाकरे गल्ली परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्ता, विविध ठिकाणी पेव्हिंग व गटर्सची कामे तसेच बसथांब्यांवर नागरिकांसाठी बाकांची सुविधा यांचा समावेश आहे. या कामांमुळे प्रभागातील रस्ते, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.यावेळी आमदार अमल महाडिक यांनी मानसिंग पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पदाची अपेक्षा न ठेवता स्वखर्चातून विकासकामे करणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असून, मानसिंग पाटील गेल्या अनेक वर्षांपासून ही बांधिलकी जपत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानसिंग पाटील हे आनंदराव पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष असून, परिसरातील सामाजिक आणि विकासकामांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्वखर्चातून विविध कामे करण्याचा त्यांचा उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास मानसिंग पाटील, नगरसेविका माधवी पाटील, नगरसेविका शीला सोनुले तसेच परिसरातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या कार्यक्रमातून प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांना चालना देण्यासोबतच त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

0 Comments