कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे, मतदारांशी थेट संपर्क साधावा आणि बूथस्तरीय यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भाजप जिल्हा कार्यालयात विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक बूथवरील जबाबदाऱ्या निश्चित करून नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर रवींद्र चव्हाण यांनी भर दिला.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे, मतदारांशी किमान दोन ते तीन वेळा संपर्क साधणे, मतदार याद्यांचा आढावा घेणे आणि बूथस्तरीय समन्वय मजबूत करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस राजेश पाध्ये यांनी मतदान केंद्रांची माहिती देत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका महत्त्वाची असून, बूथस्तरावरील यंत्रणा सक्षम करून नियोजनानुसार काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या आढावा बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस राजेश पाध्ये, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, सुरेश हळवणकर, महापौर रूपाराणी निकम, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments