Gokul Election 2026: सतेज पाटलांचा दावा; दूध दरात २५ रुपयांची वाढ देणार

राधानगरी : नवप्रवाह मराठी 

 गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पॅनेलकडून २५-० असा विजय मिळवण्याचा दावा केला जात असताना, आमदार सतेज पाटील यांनी राधानगरीतील ठरावधारकांच्या बैठकीत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.


“आमचा उद्देश २५-० नाही, तर दूध उत्पादकांच्या दुधाला २५ रुपये दरवाढ देण्याचा आहे,” असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ देण्यासोबतच पशुखाद्याचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

राधानगरी तालुक्यातील विविध गावांमध्ये ठरावधारकांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचं सांगितलं. गोकुळचा मल्टीस्टेट प्रस्ताव हाणून पाडण्यापासून ते दूध उत्पादकांच्या हितासाठी सातत्याने भूमिका घेतल्याचा दावाही त्यांनी केला.

गोकुळ दूध संघ महायुतीकडे गेल्यास भविष्यात तो अमूल दूध संघाकडे जाऊ शकतो, अशी भीतीही सतेज पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळे गोकुळ टिकवण्यासाठी एकमुखी नेतृत्वाला सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी ठरावधारकांना केलं.

दरम्यान, कांबळवाडीचे शहाजी रेडेकर, तारळेचे सरपंच रवी पाटील आणि इतर ठरावधारकांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवला. गोकुळ टिकवण्यासाठी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी सतेज पाटील यांच्या पॅनेलसोबत राहण्याची भूमिका काही ठरावधारकांनी मांडली.

गोकुळ निवडणुकीच्या प्रचारात आता २५-० विरुद्ध दूध दरात २५ रुपयांची वाढ हा मुद्दा केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments