गोकुळ दूध संघ साडेपाच लाख दूध उत्पादकांचाच राहावा; सतेज पाटलांचा महायुतीवर निशाणा

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये, तर कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याच हक्काचा आणि मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव, रुई, हातकणंगले, इंगळी आणि रेंदाळ येथे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचे मेळावे पार पडले.


गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी दूध संस्था ठरावधारकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी महायुतीतील नेत्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नसल्याचा दावा करत सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर टीका केली.

गोकुळमध्ये समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास दूध उत्पादकांना अधिक चांगला दूध दर, म्हैस खरेदीसाठी अनुदान, मुक्त गोठ्याच्या कंपाउंडसाठी ५० टक्के अनुदान आणि पशुखाद्याच्या दरात प्रति पोते १०० रुपयांची कपात करण्याचे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले. तसेच कळंबा-गारगोटी मार्गावरील कात्यायनी येथे २० एकर जागेत अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारण्याची घोषणा त्यांनी केली.

प्राथमिक दूध संस्थांच्या इमारतींसाठी अनुदान, संस्था सचिवांना मानधन, जनावरांच्या गोठ्यासाठी २५ हजार रुपयांचे सहाय्य आणि पशुधनाच्या गाभण प्रक्रियेसाठी आधुनिक ब्रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही आश्वासन यावेळी देण्यात आले.

हातकणंगले परिसरातील १६१ पैकी ८१ हून अधिक ठरावधारक समविचारी आघाडीसोबत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील दूध संघाच्या राजकारणाला वेग आला आहे.

Post a Comment

0 Comments