कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या शपथविधीच्या ठिकाणावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ठरावधारकांनी ‘तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही शपथ घेणारच नाही,’ अशी भूमिका घेत बैठक सोडली. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
संकल्पसिद्धी हॉलमधील बैठकीत नेमकं काय घडलं?
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील ठरावधारकांची बैठक कोल्हापूर शहरातील संकल्पसिद्धी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला १५० हून अधिक ठरावधारक उपस्थित होते. ठरावधारकांना शपथ देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या बैठकीत शपथ कुठे घ्यायची, यावरून नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले.
सौंदत्ती की संकल्पसिद्धी हॉल? शपथविधीवरून वाद
माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी ठरावधारकांची शपथ सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या मंदिरात जाऊन घ्यावी, अशी भूमिका मांडली. याउलट, प्रयाग चिखली येथील रघु पाटील यांनी संकल्पसिद्धी हॉलमध्येच शपथविधी पूर्ण करण्याची भूमिका घेतली. माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनीही हॉलमध्येच शपथ घेण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला.दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका कायम ठेवल्याने नावेद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि रघु पाटील यांच्यात काही काळ जोरदार वादावादी झाली. त्यामुळे बैठकीच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
‘आमच्यावर विश्वास नसेल तर शपथ घेणार नाही’
नेत्यांमधील वाद पाहून ठरावधारक संतप्त झाले. आमच्यावर विश्वास नसेल तर शपथ घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका घेत त्यांनी बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही शपथ घेणारच नाही,’ असे म्हणत ठरावधारकांनी नाराजी व्यक्त केली.इतकेच नव्हे, तर आमच्यावर अविश्वास दाखवत असाल, तर तुम्हीही संचालक झाल्यानंतर गोकुळ दूध संघात चहा सुद्धा घेणार नाही, अशी शपथ घ्या, अशा शब्दांत ठरावधारकांनी आपला संताप व्यक्त केला.
शपथविधीविना बैठक गुंडाळली
वाद वाढल्याने बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. अखेर शपथविधी न होताच बैठक गुंडाळण्यात आली. उपस्थित १५० हून अधिक ठरावधारकांना माघारी फिरावे लागले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांमध्ये शपथविधीच्या मुद्द्यावरून झालेली ही वादावादी राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. ठरावधारकांचा विश्वास संपादन करण्याऐवजी नेत्यांमध्येच मतभेद उघड झाल्याने महायुतीसमोरील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गोकुळच्या निवडणुकीत महायुती हा वाद कसा हाताळणार आणि ठरावधारकांची नाराजी कशी दूर करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments