मान्यवरांच्या भेटीगाठींनी कौस्तुभ गावडेंच्या प्रचाराला वेग!

कोल्हापूर : प्रतिनिधी

 पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे उमेदवार तथा शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये शिक्षक, शिक्षण संस्था, कर्मचारी संघटना आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी भेटीगाठी घेत गावडे यांनी प्रचाराचा विस्तार सुरू केला आहे.

उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांशी संवाद

प्रचारदौऱ्यादरम्यान कौस्तुभ गावडे यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, सातारा आयटीआय संघटनेचे अध्यक्ष नेताजी बेचले सर, सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शिल्पनिदेशक चिंतामणी काटवते, आर. वाय. जाधव आणि पुणे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे मार्गदर्शक गुलाबसिंग कदम यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटींदरम्यान शिक्षक मतदारसंघातील विविध प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेकडून देण्यात आली.


शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रचारात भर

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने पाच जिल्ह्यांतील शिक्षकांपर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी आणि संस्थाचालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर दिला आहे.

शिक्षकांची सेवा-सुरक्षा, अशैक्षणिक कामांचा वाढता भार, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि शैक्षणिक क्षेत्रातील मनुष्यबळ नियोजन हे मुद्दे त्यांच्या प्रचारात मांडले जात आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या अंमलबजावणीमुळे निर्माण होणारा अतिरिक्त कार्यभार आणि त्याचा प्राध्यापक पदसंख्येवर होणारा संभाव्य परिणाम यांसारख्या विषयांवरही प्रभावी पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांच्या प्रचारातून मांडण्यात येत आहे.

शिक्षकांच्या मागण्यांसाठी विधानपरिषदेत आवाज उठवण्याचे आश्वासन

शिक्षकांच्या विविध मागण्या विधानपरिषदेत मांडून त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन कौस्तुभ गावडे यांच्याकडून देण्यात येत आहे. आगामी काळात शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी, संवादसभा आणि विविध शिक्षक संघटनांशी चर्चा यांच्या माध्यमातून प्रचार अधिक व्यापक करण्याचे नियोजन त्यांच्या प्रचार यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, विविध जिल्ह्यांतील भेटीगाठींमुळे शिक्षकांच्या अपेक्षा जाणून घेण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील संघटनात्मक संपर्क वाढवण्यावर गावडे यांचा भर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या पुढील प्रचारदौऱ्यांकडे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments