गोकुळ निवडणूक बिनविरोध नाही; उद्या पॅनेल जाहीर : सतेज पाटील

पुणे : नवप्रवाह मराठी 

 गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून एकवाक्यता नसून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.


महायुतीकडून गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा ही केवळ राजकीय 'पिल्लू' असल्याचं सांगत, गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही, असा स्पष्ट इशारा सतेज पाटील यांनी दिला.

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या पॅनेलमधील उमेदवारांची अधिकृत घोषणा बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं. राजकारण वेगळं आणि नातेसंबंध वेगळे, असं म्हणत त्यांनी भाजपच्या राजकीय रणनीतीवरही टीका केली.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून डॉ. स्मिता जाधव यांना आमदार का करण्यात आलं नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपचा राजकीय डाव जनतेला चांगलाच माहिती असल्याचा दावा करत, महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments