गोकुळच्या अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

चुये : Navpravah Marathi 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ चुये येथे करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधत गोकुळचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणे, हाच आघाडीचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.


गोकुळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून प्रचाराला सुरुवात झाली. या वेळी माजी खासदार राजू शेट्टी, विजय देवणे, सत्यजित पाटील-सरूडकर, ऋतुराज पाटील यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी, उमेदवार आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोकुळचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न?

आमदार सतेज पाटील यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. गेल्या सहा महिन्यांपासून मतभेद असलेले पक्ष निवडणूक जाहीर होताच एकत्र आले. गोकुळचे महत्त्वाचे निर्णय मुंबईतून घेतले जात असल्याचा आरोप करत, संघाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


गोकुळ हा साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या संसाराशी जोडलेला संघ आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्तेची नसून दूध उत्पादकांचे हित आणि कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरवणारी आहे, असे पाटील म्हणाले. आघाडीच्या ‘शिट्टी’ चिन्हावरील सर्व २५ उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राजू शेट्टींचाही महायुतीवर हल्लाबोल

माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोकुळला परावलंबी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. मुंबईतील गोकुळच्या बाजारपेठेवर अमूलचे वर्चस्व निर्माण होण्याच्या शक्यतेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. महानंद बंद पडल्यानंतर मुंबईतील दूध बाजारपेठेच्या भवितव्याचाही प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली.

कोल्हापूरचा स्वाभिमान जपण्याचे आवाहन

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी गोकुळला सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. तर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळचे नियंत्रण कोल्हापुरातील दूध उत्पादकांच्या हातात राहणार की बाहेरील नेत्यांचा प्रभाव वाढणार, याचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे आवाहन केले.

माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी प्रशासक नियुक्ती आणि सुमारे १,४०० दूध संस्थांना अपात्र ठरवण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. राजूबाबा आवळे यांनी दूध उत्पादकांचा मतदानाचा अधिकार अबाधित राखण्याची गरज व्यक्त केली.

संस्थापकांच्या योगदानाची आठवण

प्रास्ताविकात शशिकांत पाटील चुयेकर यांनी गोकुळच्या उभारणीत संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. गोकुळ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा ठेवा राहावा, ही संस्थापकांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी नमूद केले.


या प्रचार शुभारंभाला आघाडीचे पदाधिकारी, उमेदवार, ठरावधारक आणि दूध उत्पादक उपस्थित होते. गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांचे हित, संघाचे स्वतंत्र अस्तित्व आणि नेतृत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments