कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. गोकुळकडून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपया 50 पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ 11 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे.
नवीन दरानुसार, 6.0 फॅट आणि 9.0 SNF गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर 53.50 रुपयांवरून 55 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर 3.5 फॅट आणि 8.5 SNF गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर 36 रुपयांवरून 37 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे.
या दूध खरेदी दरवाढीचा थेट फायदा गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना होणार असून, महिन्याला सुमारे 5 कोटी रुपयांचा अतिरिक्त दर दूध उत्पादकांना मिळणार आहे.
पावसाचे उशिरा झालेले आगमन, काही भागांमध्ये कमी-जास्त पाऊस आणि त्यामुळे चाऱ्याच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम यामुळे दूध उत्पादनात चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि Dairy Business ला चालना मिळावी, यासाठी गोकुळने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही विक्री दरवाढ 10 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. मात्र, गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
गोकुळशी सुमारे 7,500 प्राथमिक दूध संस्था संलग्न असून, त्यांच्या माध्यमातून दररोज सरासरी 14 ते 15 लाख लिटर दूध संकलित केले जाते. दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दर आणि महागाईचा विचार करून ही दरवाढ करण्यात आल्याचे गोकुळचे प्रशासकीय अध्यक्ष प्रदीप मालगावे यांनी पत्रकाद्वारे सांगितले.
दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या प्रशासकीय मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, सुधारित दूध खरेदी दराचे दरपत्रक लवकरच प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे.

0 Comments