कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या रक्षेचे गुरुवारी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानात अत्यंत भावनिक वातावरणात विसर्जन करण्यात आले. कुटुंबीय, राजकीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला.
मंगळवारी सकाळी डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन झाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांच्या रक्षाविसर्जनाचा धार्मिक विधी पार पडला. यावेळी डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय उपस्थित होते.
रक्षाविसर्जनावेळी काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील (सरूडकर), सत्यजित पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, उद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रक्षा हाती घेताना कुटुंबीयांना अश्रू अनावर :
भल्या पहाटेपासूनच पॅव्हेलियन मैदानावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आठवणींनी वातावरण भारावून गेले होते. आपल्या कुटुंबातील आधारवड कायमचा हरपल्याच्या दुःखाने कुटुंबीयांनी अत्यंत जड अंतःकरणाने रक्षेचे संकलन केले. रक्षा हाती घेताच कुटुंबीयांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले आणि उपस्थितांनाही भावना अनावर झाल्या.
'यशवंत' निवासस्थानी तिसऱ्या दिवशीही मान्यवरांची रीघ
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर कसबा बावडा येथील 'यशवंत' निवासस्थानी सलग तिसऱ्या दिवशीही देशभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यामध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार मिलिंद नार्वेकर, रोहित आर. आर. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, न्या. बी. जी. कोळसे-पाटील, प्रकाश आवाडे, क्षितिज ठाकूर, राजन साळवी, लक्ष्मण माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक जीवनात दिलेल्या योगदानाची आठवण उपस्थितांनी यावेळी कृतज्ञतेने व्यक्त केली.


0 Comments