कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या (KMT) रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अखेर सेवेत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागातील रिक्त चालक आणि वाहक पदांवर बदली प्रतीक्षा यादीवरील ज्येष्ठ तसेच शासनाच्या विनियमातील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून KMT मधील १५६ रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम होण्यासाठी प्रतीक्षेत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील ५०८ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे KMT कर्मचाऱ्यांचा निर्णय प्रलंबित होता.
या विषयावर आमदार क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शासनाने सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. यापूर्वी KMT कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठीही त्यांनी पाठपुरावा केला होता.
“गेली ३५ वर्षे सेवा करूनही कायम नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेत या कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला,” असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे आभार आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

0 Comments