डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चमधील चार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित Taiwan Experience Education Program या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. ऊर्जा साठवणूक, सुपरकॅपेसिटर, इलेक्ट्रोकॅटलिसिस आणि Green Hydrogen Production या क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन कार्याच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.


निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमिता सु. पाटील, गणेश ध. जाधव, शिवप्रसाद कृ. जाधव आणि ऋषिकेश सं. गुरव यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी प्रगत नॅनोमटेरियल्स, ऊर्जा साठवणूक प्रणाली आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान या क्षेत्रात केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी तैवानमधील National Dong Hwa University येथे “Machine Learning Aided Search for Semiconductor Nanomaterials Suitable for Green Hydrogen Generation” या संशोधन कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

AI आणि Machine Learning च्या माध्यमातून Green Hydrogen वर संशोधन

हरित हायड्रोजन निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकंडक्टर नॅनोमटेरियल्सचा शोध घेण्यासाठी Artificial Intelligence (AI) आणि Machine Learning तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या संशोधन कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. भविष्यातील शाश्वत ऊर्जा क्षेत्रासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना National Dong Hwa University मार्फत संशोधनासाठी आर्थिक सहाय्य तसेच तीन महिन्यांची संशोधन शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची, अत्याधुनिक उपकरणांवर संशोधन करण्याची आणि विविध देशांतील संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ

आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यशाळेतील सहभागासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. या संधीमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांच्या संशोधनाला जागतिक स्तरावर नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांना संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे, तसेच संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. यु. एम. पाटील आणि डॉ. एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

चारही विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना मिळालेली ही आंतरराष्ट्रीय संधी Green Hydrogen, Energy Storage आणि Nanotechnology Research क्षेत्रातील विद्यापीठाच्या संशोधनाची वाढती व्याप्ती अधोरेखित करणारी ठरली आहे.

Post a Comment

0 Comments