गोकुळ आणि सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय एकत्र; पशुधन आरोग्य, प्रशिक्षण व दुग्ध व्यवसायासाठी सामंजस्य कराराची तयारी

कोल्हापूर | नवप्रवाह मराठी 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) आणि सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालय, कणेरी यांच्यात पशुधन आरोग्य, पशुवैद्यकीय सेवा, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणि दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रस्तावित सामंजस्य करार (MoU) करण्याच्या दृष्टीने गुरुवारी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या मुख्य कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली.


बैठकीस गोकुळचे प्रशासकीय सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा, प्रा. डॉ. मार्कंडेय यांच्यासह दोन्ही संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गोकुळच्या माध्यमातून गाय-म्हैस व इतर दुधाळ जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, आजारांचे निदान, उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, प्रगत प्रजनन तंत्रज्ञान, वैरण विकास, संतुलित पशुखाद्य निर्मिती तसेच दुग्ध व्यवसायातील विविध तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

तसेच गोकुळकडून दूध उत्पादक सभासदांना दिल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांमध्ये आधुनिक संशोधन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करून त्या अधिक परिणामकारक करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. गोकुळच्या दीर्घ अनुभवाचा आणि शेतकरी हिताच्या उपक्रमांचा विचार करून सिद्धगिरी महाविद्यालयाने सहकार्याचा प्रस्ताव मांडल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

या सहकार्यामुळे गोकुळच्या विद्यमान पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून, दूध उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दुग्ध व्यवसायाचा अनुभव मिळाल्याने भविष्यात कुशल पशुवैद्यकीय तज्ज्ञ तयार होण्यासही हातभार लागणार आहे.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले म्हणाले की, गोकुळच्या सभासदांच्या पशुधनाचे आरोग्य जपणे आणि त्यांना दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे संघाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शैक्षणिक संस्थांशी सहकार्य झाल्यास आधुनिक संशोधन आणि व्यावहारिक अनुभवाचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल.

सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. मुरगेप्पा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. गोकुळसारख्या अग्रगण्य दुग्ध संस्थेसोबतचे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

बैठकीतील चर्चेनंतर प्रस्तावित सामंजस्य कराराचा विषय गोकुळच्या प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीत विचारार्थ ठेवण्यात येणार आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि पोटनियमांनुसार अंतिम निर्णय घेतल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

बैठकीस प्रा. डॉ. राऊतमारे, प्रा. डॉ. योगी, प्रा. डॉ. परिहार, महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ. दयावर्धन कामत, व्यवस्थापक पशुखाद्य डॉ. व्ही. डी. पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, रमेश पाटील, डॉ. एम. पी. पाटील, संग्राम मगदूम, मृण्मयी सातवेकर तसेच गोकुळचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments