कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
माजी राज्यपाल, पद्मश्री आणि डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या निधनानंतर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात आयोजित शोकसभेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दादासाहेबांचा "फुलाला फुलण्यात, कळीला उमलण्यात आणि माणसाला जगण्यात आनंद असला पाहिजे" हा जीवनदृष्टिकोन सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. ते शिक्षण क्षेत्रातील वटवृक्ष, दातृत्वाची मूर्ती आणि ज्ञानाचा अथांग महासागर होते, असे त्यांनी नमूद केले.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांनी देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण हेच सर्वात मोठे साधन असल्याचा दादासाहेबांचा दृढ विश्वास अधोरेखित केला. अंतर्गत दर्जा हमी कक्षाच्या संचालिका डॉ. शिंपा शर्मा यांनी समाजपरिवर्तनासाठी त्यांची अखंड धडपड आणि तालमीच्या आखाड्यापासून राज्यपालपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श असल्याचे सांगितले.
सीएचआरओ श्रीलेखा साटम यांनी दादासाहेबांनी हजारो कुटुंबांना शिक्षण, रोजगार आणि नवजीवन दिले असून ते खरे कर्मयोगी असल्याचे म्हटले. वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यभर योग्य दिशा मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
उपकुलसचिव संजय जाधव यांनी चार दशकांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत, दादासाहेबांनी कधीही कोणावर टीका केली नाही, उलट प्रत्येकाला आत्मविश्वास, धैर्य आणि सकारात्मक विचार दिल्याचे सांगितले.
यावेळी नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्य मनीषा विजापूरकर, डॉ. अर्पिता पांडे-तिवारी, डॉ. अमृता डोईजड, डॉ. चंद्रप्रभू जंगमे, रुधिर बारदेसकर आणि डॉ. अजित पाटील यांनीही श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आदरांजली अर्पण केली.

0 Comments