कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
हॉस्पिटॅलिटी उद्योग हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर आणि विद्यार्थी-पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा आणि प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. शर्मा म्हणाले, विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जातो. व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक नैतिकता आणि ग्राहककेंद्री सेवा वृत्ती जोपासल्यास देश-विदेशातील नामांकित हॉटेल्स, रिसॉर्ट्स, क्रूझ, एअरलाईन्स तसेच पर्यटन उद्योगात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
प्राचार्य रुधीर बारदेस्कर यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, शिस्त, आधुनिक सुविधा आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी देश-विदेशातील रोजगाराच्या संधींसह विद्यापीठात उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. आयक्यूएसी संचालक डॉ. शिंपा शर्मा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरज यादव यांनी केले, तर आभार प्रा. रोहन हवालदार यांनी मानले. यावेळी डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. अजित पाटील, अलाइड हेल्थ सायन्सचे समन्वयक डॉ. आर. एस. पाटील, प्रा. रुबेन काळे, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन कार्यक्रमासाठी लाभले.

0 Comments