डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला QS I-GAUGE Gold मानांकन

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला QS I-GAUGE Gold मानांकन मिळाले आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि संस्थात्मक विकासाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाविद्यालयाला हा बहुमान प्रदान करण्यात आला.


गुजरातमधील द लीला गांधीनगर येथे झालेल्या विशेष समारंभात गुजरातचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अर्जुनभाई देवाभाई मोढवाडिया यांच्या हस्ते हे मानांकन प्रदान करण्यात आले. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे आणि अधिष्ठाता डॉ. एस. डी. भोपळे यांनी महाविद्यालयाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

QS I-GAUGE ही भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या गुणवत्तेचे सर्वांगीण मूल्यमापन करणारी रेटिंग प्रणाली आहे. अध्यापन-अध्ययन, प्राध्यापकांची गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम, रोजगारक्षमता, विद्यार्थी विविधता, सुविधा, सामाजिक उत्तरदायित्व, आंतरराष्ट्रीयीकरण तसेच प्रशासन आणि संस्थात्मक कार्यक्षमता अशा विविध निकषांच्या आधारे संस्थेचे मूल्यमापन केले जाते.

या मानांकनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी समाधान व्यक्त करत हे यश अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. विश्वस्त ऋतुराज एस. पाटील यांनी भविष्यात महाविद्यालयाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य अभियांत्रिकी संस्था बनवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे सांगितले.

कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी संस्थेचे दूरदर्शी नेतृत्व, गुणवत्ता वृद्धीसाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संशोधन व नवोपक्रमाला मिळणारे प्रोत्साहन यामुळे हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाल्याचे सांगितले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेले QS I-GAUGE Gold मानांकन हे कोल्हापूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments