कोल्हापूर | नवप्रवाह मराठी
'वसा पोलिसांच्या सेवेचा...' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या पोलिस मित्र असोसिएशनच्या वतीने आयोजित 'लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्वभूषण पुरस्कार वितरण सोहळा २०२६' शुक्रवारी (३ जुलै) कोल्हापुरात उत्साहात पार पडणार आहे. समाजकारण, शिक्षण, प्रशासन आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी असणार आहेत. लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांना अभिवादन करणारा हा उपक्रम पोलिस मित्र असोसिएशनतर्फे सातत्याने राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रिया पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत तसेच आरपीआय (आठवले)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा नष्टे लॉन, वसंत-बहार रोड, कलेक्टर कार्यालयाजवळ, महावीर गार्डन शेजारी, उद्योग भवन समोर, कोल्हापूर येथे दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन पोलिस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे आणि महिला राज्याध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. राज्य उपाध्यक्ष नियाज जमादार, टीम प्रमुख मिलिंद चव्हाण, राज्य संपर्कप्रमुख मुरलीधर शिंदे, इचलकरंजी महिला शहराध्यक्ष आशा वाघिरे, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष सोहेल रंगरेज यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य कार्यक्रमाच्या तयारीत सहभागी झाले आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास कोल्हापूरसह राज्यभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 Comments