अंबाबाई तीर्थक्षेत्र कॉरिडोरसोबत कोल्हापूरच्या वाहतूक व नागरी विकासाचा एकात्मिक आराखडा राबवावा : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र तसेच साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ असून, राज्य शासनाने अंबाबाई तीर्थक्षेत्र कॉरिडोर विकास प्रकल्पासाठी सुमारे ₹१,४४५.९७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने मंदिर परिसराच्या विकासाबरोबरच कोल्हापूर शहराच्या वाहतूक, पार्किंग व नागरी सुविधांचाही एकात्मिक आराखडा तयार करणे अत्यावश्यक असल्याचे मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.


ते म्हणाले की, दरवर्षी सुमारे ५० लाख भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगची कमतरता आणि नागरी सुविधांवरील ताण या समस्या अधिक गंभीर होत आहेत. अंबाबाई कॉरिडोरबरोबरच रिंग रोड, मल्टिलेव्हल पार्किंग, स्कायवॉक, शटल सेवा आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाचा समावेश असलेला व्यापक विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे.कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कन्व्हेन्शन सेंटर, आयटी पार्क, सर्किट बेंच तसेच विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना राज्य शासनाने गती दिली असून, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले.

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक व्यापारी, रहिवासी व व्यावसायिक यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिले जाईल, अशी शासनाची भूमिका कायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवाजी रोड, शाहू मिल परिसर आणि बोर्ड ब्रिज या भागांचा समन्वय साधून मल्टिलेव्हल पार्किंग, भूमिगत मार्ग अथवा शटल सेवेचा पर्याय विचारात घ्यावा. त्यामुळे मंदिर परिसरातील वाहतूक सुरळीत होईल, संपादनाचे क्षेत्र कमी होईल, नागरिकांचे नुकसान टळेल आणि शहराचा संतुलित विकास साधता येईल, असेही त्यांनी सांगितले.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प हा केवळ मंदिरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोल्हापूर शहराच्या नियोजनबद्ध विकासाशी जोडला जावा, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली असून या संदर्भात राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments