मुंबई | नवप्रवाह मराठी
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय आणि दीर्घकालीन योगदानाची दखल घेत डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार २०२३' प्रदान करण्यात आला. मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. पाटील यांच्या समवेत पत्नी सौ. वैजयंती संजय पाटील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या पुरस्कार वितरणात २०२३ चा 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न' पुरस्कार डॉ. संजय डी. पाटील, तर २०२४ चा पुरस्कार यज्ञेश सावे यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध श्रेणीतील एकूण १८९ राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित शेतीच्या माध्यमातून देशाला जागतिक स्तरावर नेतृत्व देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील मान्यवर हे राज्याच्या कृषी संस्कृतीचे प्रेरणास्थान असून त्यांच्या कार्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठाही अधिक वाढली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरस्कार विजेत्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीची नवी दिशा दिल्याचे सांगितले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुरस्कारप्राप्तांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी विकासात सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
आधुनिक शेतीत डॉ. संजय पाटील यांचे उल्लेखनीय योगदान
डॉ. संजय डी. पाटील यांनी आधुनिक शेती, फलोत्पादन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि 'सनशाईन' या शेतकरी ब्रँडच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभारले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे कार्य राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्गार काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. पाटील यांच्या कृषी, दुग्ध व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव कार्य उभारल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. संजय डी. पाटील यांची प्रतिक्रिया
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, "हा सन्मान माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, सहकारी, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. भविष्यातही शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न कायम राहतील."

0 Comments