३९ नामांकित कंपन्यांच्या सहभागातून ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

 कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी मेळाव्यात ३९ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यातून ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना मोठी संधी उपलब्ध झाली.


गरजू विद्यार्थी तसेच बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यास ६१० उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी ३०० हून अधिक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या ११८ उमेदवारांना पुढील कार्यालयीन व अंतिम मुलाखत प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, रोजगाराच्या संधी आणि बदलत्या औद्योगिक गरजांनुसार कौशल्यविकासाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक करत मेळाव्याच्या उद्दिष्टांची माहिती दिली. विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष रोटेरियन राहुल कुलकर्णी यांनी रोटरीच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत रोजगारनिर्मितीच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्टच्या सीएसआर विभागाच्या डेप्युटी मॅनेजर माधुरी मुसळे यांनी संस्थेच्या कौशल्यविकास आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी आभार मानले.

कार्यक्रमास आयक्यूएसी संचालिका डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सुशांत चंदनशिवे, रोटेरियन डॉ. भरत कोटकर, डॉ. अभिजित माने, डॉ. राजेश ख्यालप्पा, संजय जाधव, अश्विन देसाई, व्यंकटेश बडवे, अभिजित पाटील, अनिकेत परदेशी, डॉ. दीपक पाटील यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments