गोकुळचा वारकऱ्यांसाठी सेवाभाव! लोणंद आणि फलटण येथे दूध पावडर, टोपी व साहित्याचे मोफत वाटप

 कोल्हापूर | प्रतिनिधी 

 महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) यांच्यावतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सेवा उपक्रम राबविण्यात आला.


दि. १५ आणि १७ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर, साहित्य ठेवण्यासाठी कापडी पिशव्या, टोपी तसेच दिनदर्शिकांचे मोफत वाटप करण्यात आले. गोकुळच्या प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परूळेकर आणि सुनिल धायगुडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याचा जिवंत वारसा मानला जातो. या परंपरेप्रती आदर व्यक्त करत गोकुळतर्फे दरवर्षी पालखी सोहळ्यात विविध सेवा उपक्रम राबविले जातात. पालखी सोहळ्यात राज्यभरातील अनेक दूध उत्पादक वारकरी म्हणून सहभागी होत असल्याने त्यांच्या सेवेत सहभागी होणे आणि गोकुळचा सेवाभाव त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे गोकुळकडून सांगण्यात आले.

यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, मार्केटिंग विभागाचे सुनिल गायकवाड, विनय पाटील, नवीन येसादे तसेच विविध दिंडी प्रमुख, वारकरी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments