Gokul Dairy ला सहकार विभागाची दाद; शिरगाव प्रकल्पाची पाहणी

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ)च्या शिरगाव येथील अत्याधुनिक दुग्ध प्रकल्पाला सहकार विभागातील उपनिबंधक व सहाय्यक निबंधकांनी सदिच्छा भेट देत गोकुळच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.


या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी दूध संकलन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच दूध उत्पादक सभासदांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधांची माहिती घेतली. गोकुळ परिवारातर्फे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे तसेच सदस्य सागर बलकवडे आणि डॉ. चंद्रकांत परुळेकर यांच्या हस्ते उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


हातकणंगलेचे उपनिबंधक नारायण परजणे यांनी गोकुळ दूध संघ हा सहकार क्षेत्रातील एक आदर्श व अग्रगण्य संघ असल्याचे सांगितले. प्रकल्पातील स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्पादन प्रक्रियेतील गुणवत्ता नियंत्रण पाहून समाधान व्यक्त केले.

“दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याचे गोकुळचे कार्य प्रेरणादायी आहे,” असे मत नारायण परजणे यांनी व्यक्त केले.

यावेळी डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी यांनी दूध संकलनापासून ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचविण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दूध उत्पादक सभासदांसाठीच्या कल्याणकारी योजना, सेवा-सुविधा आणि गोकुळच्या गुणवत्ता धोरणाचा आढावा सादर केला.या भेटीमुळे सहकार विभाग आणि गोकुळ दूध संघातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अशा भेटी उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी उपनिबंधक नारायण परजणे यांच्यासह विविध तालुक्यांचे सहाय्यक निबंधक, सहकार विभागाचे अधिकारी तसेच गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments