कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE), मुंबई यांच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या अकॅडमिक मॉनिटरिंगमध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे. पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स विभागांना 'एक्सलंट', तर मेकॅनिकल आणि सिव्हिल विभागांना 'व्हेरी गुड' श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. ही माहिती प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.
एमएसबीटीईच्या तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे निकाल, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम, उद्योग क्षेत्राशी केलेले सामंजस्य करार, शिक्षकांसाठी राबविण्यात आलेले संशोधन व प्रोत्साहनपर उपक्रम तसेच विद्यार्थ्यांना मिळालेली पेटंट यांचे सखोल मूल्यमापन केले. या अहवालाच्या आधारे पॉलिटेक्निकला ही मानाची श्रेणी मिळाली.
विद्यार्थिनींसाठी 'हिरकणी मंच' अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांचीदेखील समितीने विशेष दखल घेतली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि श्रीलेखा साटम यांनी प्राचार्य, विभागप्रमुख आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
या यशासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments