डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड; ६.३ लाखांचे सरासरी पॅकेज

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंटचा नवा विक्रम नोंदवत तब्बल ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, सर्वांगीण विकास आणि सक्षम प्लेसमेंट व्यवस्थेमुळे यंदाही विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.


यावर्षी एचपी, मोव्हेट, टीई कनेक्टिव्हिटी, टीसीएस, जॉन्सन कंट्रोल्स, डिलॉईट, ब्रिटिश पेट्रोलियम, हेक्सावेअर, अमेझॉन, टेक महिंद्रा, इन्फोसिस, फोर्स मोटर्स, भारत फोर्ज, शेफलर इंडिया, लुकास टीव्हीएस, सोलर ग्रुप, सागर डिफेन्स, टेक्निमाँट, हार्मनी ऑर्गॅनिक्स, प्लेटेक्स इंडिया, गोदरेज प्रॉपर्टीज, बेलराईज इंडस्ट्रीज आदी नामांकित कंपन्यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड केली.

यंदाच्या प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना सरासरी ६.३ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले असून, २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक पगाराच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. मोव्हेटमध्ये ९ लाख, एचपीमध्ये ८.५ लाख, टीई कनेक्टिव्हिटीमध्ये ८ लाख, टीसीएसमध्ये ७ लाख, जॉन्सन कंट्रोल्समध्ये ५.६ लाख, सोलर ग्रुप व पेगाससमध्ये ५.५ लाख, जीएचके हॉस्पिटॅलिटी अँड इन्फ्रा लिमिटेडमध्ये ५.२५ लाख तसेच डिलॉईट आणि ब्रिटिश पेट्रोलियममध्ये ४.५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, महाविद्यालयाला नुकतेच वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन तसेच शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक मोठ्या पॅकेजच्या संधी उपलब्ध होतील.

विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी हे यश विद्यार्थ्यांचे परिश्रम, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक व्यवस्थेचे प्रतीक असल्याचे सांगितले. तर कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार दिले जाणारे तांत्रिक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मॉक इंटरव्ह्यू, करिअर काउन्सेलिंग, इंटर्नशिप आणि प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments