२० मे रोजी देशव्यापी औषध विक्रेत्यांचा बंद | ऑनलाईन औषध विक्रीविरोधात AIOCD चा एल्गार

कोल्हापूर | नवप्रवाह मराठी 

  देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) च्या नेतृत्वाखाली हा बंद आयोजित करण्यात आला असून, ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या अ-व्यावसायिक स्पर्धेविरोधात हा निर्णायक एल्गार मानला जात आहे.

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्या मते, औषध व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 व Rules 1945 अंतर्गत चालतो. मात्र, ऑनलाईन औषध विक्रीसाठी स्पष्ट कायदेशीर चौकट नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

कायदेशीर मुद्दे आणि वाद :

केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी GSR 517(E) अंतर्गत नोटिफिकेशन जारी केले होते, परंतु ते अद्याप कायद्यात रूपांतरित झालेले नाही. याशिवाय, दिल्ली उच्च न्यायालयात या संदर्भातील याचिका प्रलंबित असून न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगिती दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.

कोरोना काळात २६ मार्च २०२० रोजी GSR 220(E) अंतर्गत औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी तात्पुरती सवलत देण्यात आली होती. मात्र, महामारी संपूनही ही सवलत कायम ठेवण्यात आल्याने ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप आहे.

किंमत नियंत्रण आणि स्पर्धा :

Drug Price Control Order (DPCO) 2013 नुसार औषधांवर मर्यादित नफा निश्चित करण्यात आला आहे. जीवनावश्यक औषधांवर केवळ ८% नफा परवानगी असताना, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या २०% ते ५०% पर्यंत सूट देत आहेत. यामुळे लहान औषध विक्रेत्यांवर आर्थिक दबाव वाढला असून, देशातील सुमारे १२.५० लाख विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारविरोधात नाराजी :

संघटनेने केंद्र सरकारकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वारंवार निवेदने दिली, परंतु ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांसाठी सूचना :

२० मे रोजी देशभरातील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments