कोल्हापुरात महिलांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहांचे रविवारी लोकार्पण; कृष्णराज महाडिकांकडून पाहणी

 कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

कोल्हापूर शहरातील महिला भाविक, पर्यटक आणि स्थानिक महिलांसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक महिला स्वच्छतागृहांचे लोकार्पण रविवारी १० मे रोजी होणार आहे. खासबाग मैदान चौक आणि ताराबाई पार्क येथील एसटी कार्यशाळेबाहेरील जागेत ही वातानुकूलित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी शुक्रवारी या कामांची पाहणी केली.



साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराच्या दर्शनासाठी तसेच पन्हाळा, ज्योतिबा आणि इतर पर्यटनस्थळांसाठी दररोज हजारो भाविक आणि पर्यटक कोल्हापुरात येतात. मात्र महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वतंत्र आणि आधुनिक स्वच्छतागृहांची मागणी होत होती.

महायुतीची सत्ता कोल्हापूर महापालिकेत आल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या माध्यमातून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर तातडीने निधी मंजूर करण्यात आला आणि खासबाग मैदान तसेच ताराबाई पार्क येथे महिला स्वच्छतागृह उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

अवघ्या दोन महिन्यांत ही स्वच्छतागृहे पूर्ण झाली असून महिलांसाठी आवश्यक असलेल्या सर्व आधुनिक सुविधा येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील महिला, पर्यटक आणि भाविकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

या स्वच्छतागृहांच्या लोकार्पण कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजता खासबाग मैदान येथे तर सकाळी साडेदहा वाजता ताराबाई पार्क येथील आरटीओ कार्यालयाजवळ लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments