कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावी अर्थात SSC Result 2025 मध्ये कोल्हापूर विभागाने पुन्हा एकदा राज्यात दुसरा क्रमांक कायम राखला आहे. यंदा कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 95.47 टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत 1.40 टक्क्यांनी घट झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 96.67 टक्के लागला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 0.85 टक्क्यांनी कमी झाला आहे.
२० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या SSC Board Exam मध्ये कोल्हापूर विभागातून एकूण 1 लाख 29 हजार 6 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 लाख 23 हजार 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागाने 2021 चा अपवाद वगळता सलग अकरा वर्ष राज्यात दुसरा क्रमांक टिकवून ठेवला आहे.
यंदा राज्यात कोकण विभागाने 97.62 टक्के निकालासह प्रथम क्रमांक मिळवला, तर Kolhapur Division ने 95.47 टक्क्यांसह दुसरे स्थान पटकावले. प्रभारी विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने गैरप्रकारांना आळा बसला आणि त्यामुळे निकालात किंचित घट झाली.”
फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास, एकूण 54 हजार 101 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 52 हजार 304 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 928 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच 15 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले.
निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत celebration केले. अनेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय सहाय्यक सचिव गजानन उकिर्डे, लेखाधिकारी प्रणिती जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार, मनोज शिंदे आणि पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते.

0 Comments