कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
बालशिक्षणात पालकांची सक्रिय भागीदारी महत्त्वाची मानणाऱ्या पोदार प्रेप, कोल्हापूर येथे ‘Spend a Day with Your Child at School – Be a Child for a Day’ हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून पालकांना आपल्या मुलांसोबत प्रत्यक्ष वर्गात सहभागी होऊन शिक्षण प्रक्रियेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
‘Kiducation’ तत्त्वज्ञानावर आधारित तसेच राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा (NCF 2022) मधील पंचकोश संकल्पनेशी सुसंगत अशा या उपक्रमातून बालकांच्या सर्वांगीण विकासाचे विविध पैलू अधोरेखित करण्यात आले. अन्नमय (शारीरिक), प्राणमय (ऊर्जा), मनोमय (भावनिक), विज्ञानमय (बौद्धिक) आणि आनंदमय (आनंद) या पाच स्तरांवर मुलांचा विकास कसा घडविला जातो, याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.उपक्रमादरम्यान पालकांनी सर्कल टाइम, गोष्टी सांगणे, संगीत व हालचाल तसेच खेळावर आधारित शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या माध्यमातून भाषा कौशल्य, संख्याज्ञान, सर्जनशीलता, सामाजिक कौशल्ये आणि आत्मविश्वास यांचा विकास कसा होतो, याची प्रत्यक्ष अनुभूती पालकांना मिळाली.
शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता अनुभवाधारित आणि आनंददायी कसे बनवले जाते, याची जाणीव या उपक्रमातून पालकांना झाली. तसेच शाळा व पालक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यास या उपक्रमाने महत्त्वपूर्ण हातभार लावला.
या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर, उपप्राचार्या मनीषा आंब्राळे तसेच मुख्याध्यापिका बिजल मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

0 Comments