कोल्हापूर विभागाचा निकाल ८९.९७ टक्के; कोकण अव्वल, लातूर शेवटचा

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल ८९.९७ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाने ९४.१४ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावले असून, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के नोंदविण्यात आला.


कोल्हापूर विभागात यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३.६७ टक्क्यांची घट झाली आहे. निकालात ( Result ) मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.८१ टक्के असून, मुलांचे ८५.५२ टक्के आहे. मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा ९.२९ टक्क्यांनी अधिक आहे.

राज्याच्या एकूण निकालात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ पुणे, अमरावती, नाशिक, मुंबई आणि कोल्हापूर विभाग अनुक्रमे दुसऱ्या ते सहाव्या क्रमांकावर आहेत. छत्रपती संभाजीनगर सातव्या, नागपूर आठव्या, तर लातूर विभाग नवव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, कॉपीमुक्त परीक्षा अभियान (Copy-Free Exam Campaign) अंतर्गत यंदा कडक उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसविण्यात आले होते, तसेच ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात आली. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसला. काही अपवादात्मक घटना वगळता परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडली.

निकालात घट दिसून आली असली तरी गुणवत्ता वाढल्याचे मत कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पत्रकार परिषदेला सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणती जमदग्नी, वरिष्ठ अध्यक्ष दीपक पोवार, मनोज शिंदे आणि पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments