शिगाव (सांगली) : प्रतिनिधी
मधाळेनगर एसटी स्टँड ते वारणा नदी पुलापर्यंत प्रलंबित असलेल्या गटाराच्या कामासाठी नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानप्रबोधिनी व भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले. प्रशासनाकडून गटाराच्या कामाबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.
पावसाळ्यात गटारीचे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होते. याचा फटका विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अॅड. बाबासाहेब मधाळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणस्थळी विविध सामाजिक, राजकीय आणि स्थानिक मान्यवरांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
दरम्यान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून गटाराच्या कामाला लवकर सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला.
अॅड. बाबासाहेब मधाळे यांनी प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण न केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.

0 Comments