कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत शाहू महाराजांच्या विचारांना अभिवादन केले.
कार्यक्रमात उपस्थित महिलांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि संघटन विस्ताराचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात जिजाऊ ब्रिगेडची शाखा स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यावेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. घोषणांनी आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
या प्रसंगी रंजना पाटील, कल्पना देसाई, प्राजक्ता आंबले, अनुपमा चव्हाण, कविता कोंडेकर, अनिता गवळी, सीमा भोसले यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी, "राजर्षी शाहू महाराजांचे समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड कटिबद्ध आहे," असा निर्धार व्यक्त केला. समाजप्रबोधन आणि महिला संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

0 Comments