इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे डॉ. योगेश गोडबोले यांची निवड

 कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची इंडियन डेअरी असोसिएशन (IDA) पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी (Vice Chairman) बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे कोल्हापूरच्या दुग्ध क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व मिळाले आहे.IDA च्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा तसेच दमण आणि दीव या राज्यांचा समावेश आहे. दुग्ध व्यवसाय, संशोधन, तंत्रज्ञान आणि गुणवत्ता व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करणारी ही देशातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते.


डॉ. गोडबोले हे 2021 पासून गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. सुमारे 4200 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.दुग्ध क्षेत्रातील 31 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. गोडबोले यांनी सहकारी, खाजगी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. दूध संकलन, गुणवत्ता नियंत्रण, दुग्ध प्रक्रिया, विक्री-विपणन आणि पशुपालक सेवा या क्षेत्रांतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. गोडबोले यांनी इंडियन डेअरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे आणि शुभेच्छुकांचे आभार मानले. तसेच आपल्या निवडीचे श्रेय गोकुळच्या संचालक मंडळाला, प्रशासनाला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला दिले.

पश्चिम विभागातील दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत करण्यासाठी सर्व संबंधित घटकांशी समन्वय साधून काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments