गोरगरिबांचे रेशन बंद केल्यास नोटिसांची होळी करू; करवीर शिवसेना ठाकरे गटाचा इशारा

कोल्हापूर | नवप्रवाह मराठी 

अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या रेशनधारकांना पाठविण्यात आलेल्या नोटिसांवरून करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोरगरिबांचे रेशन बंद करण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवावा, अन्यथा गावागावातील रेशन दुकानदारांच्या दारात नोटिसांची होळी करून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.


शासनाने अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना विविध कारणांवरून नोटिसा बजावल्या आहेत. लाभार्थी कंपनीचा संचालक नसावा, आयकर विवरणपत्र भरलेले नसावे तसेच भूमिहीन किंवा अल्पभूधारकांनाही नोटिसा देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी सांगितले की, अनेक लाभार्थी खरोखरच आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत. तसेच रेशनकार्डवर नावे नसलेल्या पण ऑनलाइन नोंद असलेल्या घटकांनाही लाभ मिळणे आवश्यक आहे. स्वेच्छेने रेशनचा लाभ सोडणाऱ्यांचे रेशन बंद करावे, मात्र सर्वसामान्य गरीब नागरिकांवर अन्यायकारक अटी लादू नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी "मिशन सुधार राईटफुल टार्गेट"च्या नावाखाली गोरगरिबांचे रेशन बंद करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. शिवसेना हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, नायब तहसीलदार भालचंद्र यादव आणि पुरवठा अधिकारी विकास देसाई यांनी या मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहोचवून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, बाळासाहेब नलवडे, जितू कुबडे, सचिन नागटिळक, राजू सांगावकर, प्रकाश मुदुगडे, दिनेश परमार, संतोष चौगुले, दत्ता फराकटे, कैलास जाधव, दीपक पोपटाणी, सुनील पारपाणी, किशोर कामरा, मोहन रजपूत, बाबुराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments