कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर चर्चा करून त्यावर उपाययोजना ठरवण्यासाठी १४ जून रोजी कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवास उर्फ बापू लाड, किशोर जामदार आणि प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, ग्रामविकास, जलसंपदा, जलसंधारण आणि नगरविकास विभागांशी संबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. तसेच संघटनेचे ठराव, विविध मागण्या आणि पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
अधिवेशनात थकीत देयके तात्काळ अदा करणे, ई-टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, अनुभव व आर्थिक निकष व्यवहार्य करणे, जीएसटी भरपाईचा लाभ देणे, कंत्राटदारविरोधी अटी रद्द करणे आदी महत्त्वाच्या मागण्यांवर विचारविनिमय होणार आहे.
या महाअधिवेशनासाठी राज्यभरातील विविध कंत्राटदार संघटना, अभियंता संघटना आणि मटेरियल पुरवठादार संघटना सहभागी होणार असून मोठ्या संख्येने कंत्राटदार उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

0 Comments