गॅस गैरव्यवस्थेविरोधात उपोषण तीव्र,प्रवीण गणाचारींचे आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

घरगुती गॅस सिलेंडर ग्रामीण भागात वेळेवर गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्याच्या समस्येविरोधात तसेच किणी (ता. चंदगड) येथील गायरान जागेवर संविधान भवनासाठी जागा मंजूर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गणाचारी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणच्या वेळी प्रवीण गणाचारी यांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक व मानसिक ताण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले असून गॅस सिलेंडरचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असूनसुद्धा वेळेत आणि घरपोच मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

उपोषणस्थळी चौथ्या दिवशीही विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक, महिला आणि नागरिकांनी भेट देत उपोषण लाख पाठिंबा दर्शविला. काही कार्यकर्त्यांनी शासनाने तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या प्रश्नांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

प्रवीण गणाचारी यांनी सांगितले की, किणी गावातील गायरान जागेवर संविधान भवन उभारण्याची मागणी ही केवळ इमारतीपुरती नसून सामाजिक जागृती आणि संविधान मूल्यांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाची आहे. या भवनातून युवकांना मार्गदर्शन, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, वाचनालय आणि संविधान जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषणच्या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपात चुल पेटवून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. “ग्रामीण भागात आजही अनेक महिलांना गॅस अभावी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे, ही दुर्दैवी परिस्थिती आहे,” असे गणाचारी यांनी म्हटले.

दरम्यान, उपोषणाची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रवीण गणाचारी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.

“गॅस वितरणातील गैरव्यवस्था थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, गॅस दर कमी करावेत आणि संविधान भवनासाठी जागा मंजूर करावी. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील,” असा इशारा प्रवीण गणाचारी यांनी प्रशासनाला दिला.

Post a Comment

0 Comments