जयसिंगपूरमध्ये भरदिवसा तरुणाचा खून; व्हॉट्सॲप स्टेटसवरील वादातून हल्ला, ४ तासांत आरोपी अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी ( नियाज जमादार )

  कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे भरदिवसा एका 29 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साहिल झाकीर काझी असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना सा. रे. पाटील मैदानावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू लक्ष्मण कांबळे आणि साहिल काझी यांच्यात पूर्वीपासून वाद होता. गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून झालेल्या भांडणासह व्हॉट्सॲप स्टेटसवरील कमेंटचा राग आरोपीच्या मनात होता.


गुरुवारी दुपारी आरोपीने साहिल काझी आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी यांना चर्चेच्या बहाण्याने सा. रे. पाटील मैदानावर बोलावले. चर्चा सुरू असताना आरोपीने अचानक चाकू काढून साहिलवर सपासप वार केले. छातीवर आणि हातावर गंभीर वार झाल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची जलद कारवाई : 

घटनेनंतर जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी राजू कांबळे याला सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ परिसरातून अवघ्या चार तासांत ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या जलद कारवाईबद्दल पोलीस पथकाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करत आहेत.



Post a Comment

0 Comments