शाहूवाडी : प्रतिनिधी ( रोहित पास्ते )
शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावात वनविभागाचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तोतयाला ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम खंडू खोत, वय ३४, रा. दमेवाडी हा संशयित इसम आंबर्डे गावात फिरत होता. तो नागरिकांच्या घरांची तसेच मागील जागांची पाहणी करून “तुम्ही जंगलातून लाकूड आणले आहे, त्याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले आहेत,” अशी भीती दाखवत नागरिकांकडून पैशांची मागणी करत होता.
हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. संबंधित इसम हा बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले.या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी उज्वला मगदूम यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अशा तोतयांपासून सावध राहा तक्रार करा : उज्वला मगदूम!
दरम्यान, वनविभागाचे नाव सांगून कोणीही पैसे मागत असल्यास नागरिकांनी अशा तोतयांपासून सावध राहावे आणि तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी उज्वला मगदूम यांनी केले आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी उज्वला मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दत्ता मुखाडे, वनपाल पी. बी. चव्हाण तसेच सर्जेराव पवार, नामदेव दळवी, अनिल पाटील आदींनी केली.

0 Comments