कोल्हापूर IT Park मोठी घोषणा | कोल्हापूर टॉप 10 शहरांत आणणार – Rajesh Kshirsagar

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आयटी पार्क, स्मारक आणि टेक्स्टाईल टुरिझम हबसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जाणार असून येत्या काळात कोल्हापूरला महाराष्ट्रातील टॉप 10 शहरांमध्ये स्थान मिळवून देण्याचा निर्धार आमदार Rajesh Kshirsagar यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्य सुविधा, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी असलेले शहर असून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही कोल्हापूर देशातील प्रमुख शहरांमध्ये गणले जाते.

कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने ५ मार्च २०२६ रोजी मंजुरी दिली आहे. ही बैठक मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या निर्णयामुळे कोल्हापूरमध्ये आयटी उद्योगांना चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.

तसेच छत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक आणि टेक्स्टाईल टुरिझम हब उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रकल्पामध्ये शाहू मिल म्युझियम, टेक्सटाईल इंजिनिअरिंग कॉलेज, फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, फॅब्रिक डिझाइन इन्स्टिट्यूट, १००० ते १२०० आसन क्षमतेचे अत्याधुनिक ऑडिटोरियम, संगीत विद्यालय आणि पर्यटनासाठी अॅम्युझमेंट पार्क उभारण्याचा समावेश आहे.

या सर्व प्रकल्पांमुळे कोल्हापूरमध्ये उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल. तसेच आयटी, सेवा आणि पूरक उद्योगांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन रोजगाराच्या संधी वाढतील, असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments