कोल्हापूर सायबर चौकात MD Drugs व हायड्रोपोनिक गांजा जप्त. दोघे अटकेत, 12.47 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी

  कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात विक्रीसाठी आणलेले एम डी ड्रग्ज (Mephedrone) आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त करत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अब्राहम जॉकी घोन्सालीस (वय २३, रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) आणि शाहीद ईब्राहीम मोकाशी (वय २१, रा. रैनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून १२ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सतीश होडगर व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सायबर चौक परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी अब्राहम जॉकी घोन्सालीस याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३१.३१० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (किंमत ३,१३,१०० रुपये) तसेच ३३.५४० ग्रॅम एम डी ड्रग्ज (Mephedrone) (किंमत ३,३५,४०० रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यानंतर आरोपी शाहीद ईब्राहीम मोकाशी याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३५.३३० ग्रॅम एम डी ड्रग्ज (Mephedrone) (किंमत ३,५३,३०० रुपये) तसेच मोबाईल हँडसेट व इतर साहित्य असा २,४५,२०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.या कारवाईत एकूण ६८.८७ ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि ३१.३१० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा १०,०१,८०० रुपयांचा अमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल मिळून १२,४७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. अमोल पाटील, पो.कॉ. संदिप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगांवकर, सचिन पाटील, शाहू तळेकर, सुशांत तळप यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments