कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना अवधुत लहू धुरे (वय २३, रा. फये, ता. भुदरगड) याला नवीन वाशी नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.तपासादरम्यान आरोपीने त्याची मैत्रीण तेजस्विनी विक्रम बुरबुसे हिच्या साथीने नागदेववाडी येथे शेजारी राहणाऱ्या शितल रामचंद्र गावडे यांच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली.
जप्त मुद्देमालात ३२.३०० ग्रॅमचे सोन्याचे गंठण, सोन्याची अंगठी तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, गारगोटी शाखेत तारण ठेवलेला १०.३० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार रणजित पाटील (तपास अधिकारी), विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे आणि श्रीधर जाधव यांनी सहभाग घेतला.
मुख्य आरोपी अवधुत धुरे याच्यावर यापूर्वी मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

0 Comments