कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर आणि नेदरलँड्समधील जागतिक दर्जाच्या इरॅस्मस मेडिकल सेंटर, रोटर्डम यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संशोधन आणि शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांसाठी जागतिक स्तरावरील संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
वैद्यकीय जैवतंत्रज्ञान, स्टेम सेल्स व पुनरुत्पादक वैद्यकशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांनी १५ ते ३० जून २०२६ या कालावधीत इरॅस्मस मेडिकल सेंटर येथे संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी भेट दिली. या भेटीदरम्यान विविध संशोधन प्रयोगशाळांना भेटी देत संशोधकांशी संवाद साधण्यात आला तसेच भविष्यातील संयुक्त संशोधनाबाबत सविस्तर चर्चा झाली. याच वेळी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांनी सांगितले की, या करारामुळे विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, शैक्षणिक सहकार्य आणि नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांना मोठी चालना मिळणार आहे.कार्बन क्वांटम डॉट्स, नॅनोबायोटेक्नॉलॉजी, बायोसेंसर, कर्करोगाचे प्रारंभिक निदान आणि वैद्यकीय निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रात डॉ. तिवारी यांनी उल्लेखनीय संशोधन केले असून त्यांच्या अनेक संशोधन लेखांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशन झाले आहे. त्यांच्या नावावर अनेक पेटंट्सही आहेत.
या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. पी. एस. पाटील आणि अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments