कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. शेतकऱ्यांवरील जाचक अटी तात्काळ रद्द करून comprehensive loan waiver जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे सरकारने कोणत्याही अटींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या आंदोलनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी बावनकुळे यांची उपहासात्मक वेशभूषा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. बंगला, गाडी किंवा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत मनसेने सरकारवर टीका केली.
“शेतकरी देशाचा अन्नदाता असून तो विविध प्रकारचे कर भरतो. मात्र मदतीच्या वेळी त्याच्यावर अटींचा बोजा टाकला जातो. दुसरीकडे आमदार आणि मंत्र्यांना मानधन व pension देताना कोणतीही अट लावली जात नाही,” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
सरकारने शेतकऱ्यांबाबत दुजाभाव न करता तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन, निलेश पाटील, कुमार पुदाले, बाळासाहेब कदम, वैभव भोसले, विश्वजित पाटील, वृषभ आमते, युवराज येडुरे, संजय पाटील, राहुल पाटील, निलेश धुम्मा, भगवंत जांभळे, राजेंद्र चव्हाण, निलेश भिसे, तुषार मालवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0 Comments