डॉ. महादेव नरके यांची आयएसटीईच्या राष्ट्रीय परिषदेत बिनविरोध निवड

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील ग्रुपच्या शैक्षणिक क्षेत्रातील शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांची नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात आयएसटीईच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.


या निवडीमुळे डी. वाय. पाटील ग्रुपला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. महादेव नरके यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीसाठी आयएसटीईचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.


देशभरातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, कुलगुरू, रजिस्ट्रार, प्राचार्य आणि अनुभवी प्राध्यापक यांची आयएसटीईच्या कौन्सिल मेंबरपदी निवड केली जाते. देशभरातील साडेपाच हजार शैक्षणिक संस्था आयएसटीईच्या सभासद असून, दीड लाखांहून अधिक तंत्रशिक्षण शिक्षक लाइफ मेंबर आणि दोन लाखांहून अधिक विद्यार्थी सदस्य आहेत.
शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत करण्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपक्रम, तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न, तसेच संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे काम आयएसटीईच्या माध्यमातून केले जाते.

डॉ. महादेव नरके यांना यापूर्वी रोटरी क्लब, किर्लोस्कर ग्रुप, आयएसटीई, लोकमत मीडिया, डिजिटल मीडिया संघटना आणि समाजक्रांती संघटना यांसारख्या विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

या संधीच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आयएसटीईला आणखी नावारूपाला आणण्याचा विश्वास डॉ. महादेव नरके यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments