Kolhapur मध्ये ‘श्रावण व्रतवैकल्य’; २४ ऑगस्टला १०८ दाम्पत्य सामुदायिक उपवास सोडणार

कोल्हापूर : नवप्रवाह मराठी 

 हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त कोल्हापुरात ‘श्रावण व्रतवैकल्य’ या सामुदायिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम अखंडितपणे राबविण्यात येत आहे. यंदा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.


नष्टे लॉन, महावीर गार्डनजवळ, कोल्हापूर येथे ‘श्रावण व्रतवैकल्य’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा आणि भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली.

१३ वर्षांची परंपरा

हिंदू धर्मातील सण-परंपरांची महती नागरिकांपर्यंत पोहोचावी, हिंदू धर्माचे जागरण आणि संघटन व्हावे, तसेच हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या १३ वर्षांपासून हा धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे.या पार्श्वभूमीवर श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे पार पडली.

पंचगंगा नदीतून कावडीने आणलेल्या जलाने अभिषेक

कार्यक्रमाच्या दिवशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून पंचगंगा नदीच्या तीरावरून कावडीने पाणी आणले जाणार आहे. या पवित्र जलाने श्री महादेवाच्या पिंडीवर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर जलाभिषेक करण्यात येणार आहे.

यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होणार असून, ११ नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञाला प्रारंभ केला जाणार आहे.

१०८ दाम्पत्य सामुदायिक उपवास सोडणार

महायज्ञानंतर हिंदू देवतांचे पूजन, भारतमातेचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध जाती-पंथांतील १०८ दाम्पत्य एकाचवेळी केळीच्या पानावर सात्विक भोजन करून सामुदायिक पद्धतीने आपला उपवास सोडणार आहेत.या कार्यक्रमासाठी हिंदू धर्मातील विविध जाती-पंथांतील मान्यवर यजमान उपस्थित राहणार आहेत.

इस्कॉनच्या भजन-कीर्तनाचे आयोजन

कार्यक्रमात इस्कॉनच्या वतीने भजन आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या भजन-कीर्तनातून उपस्थितांना आध्यात्मिक अनुभव मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.हिंदू धर्माची प्रगती, हिंदू संस्कृतीचे जतन आणि सामाजिक संघटन या उद्देशाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

‘श्रावण व्रतवैकल्य’ कार्यक्रमास कोल्हापूर शहरातील नागरिक, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तालीम संस्था, विविध मंडळांचे कार्यकर्ते तसेच हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त हिंदू धर्म संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीस ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा वाघापूरकर, यादव महाराज, श्रीकांत पोतनीस, उदय भोसले, किशोर घाटगे, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे, निरंजन शिंदे, सुनील सामंत, कमलाकर किलकिले, विक्रम जरग, जी. जी. जोशी, विकास यादव, किरण दुसे, अर्जुन आंबी, श्रीमती पूजा भोर यांच्यासह सकल हिंदू समाज आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments