कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात महामार्ग रद्द करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. शिवाजी सावंत सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात संभाव्य नवीन अलाइनमेंटमधील गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून Satej Patil, Raju Shetty, तसेच माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झाला पाहिजे. अलाइनमेंट बदलून प्रश्न सुटणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी संघटितपणे या प्रकल्पाला विरोध करत आहेत, त्यामुळे सरकारला अलाइनमेंट बदलावी लागली. मात्र सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.तसेच शेतकऱ्यांना जमीन देण्यासाठी एजंट नेमले जात असून, आर्थिक आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाचे मुख्य केंद्र कोल्हापूर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना Raju Shetty यांनी या महामार्ग प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. “मूठभर ठेकेदार आणि काही सत्ताधारी आमदारांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच सरकारने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
माजी आमदार राजेश पाटील यांनी पर्यावरणीय परिणामांबाबत चिंता व्यक्त करत, या प्रकल्पामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होईल आणि वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याची शक्यता वाढेल, असे सांगितले.
संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी या प्रकल्पात काही व्यक्तींनी जमीन खरेदी केल्याचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली. तसेच या प्रकल्पात कंत्राटदारांचे हितसंबंध असल्याचा आरोप त्यांनी केला.
संपत देसाई यांनी या महामार्गामुळे स्थानिक संस्कृती व पर्यावरण धोक्यात येईल, तसेच प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही, असे सांगितले.
या मेळाव्यात जिल्हा व तालुकास्तरावर पुढील मेळावे घेऊन आंदोलन अधिक तीव्र करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शेतकऱ्यांनी एकजूट राखून संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

0 Comments