कोल्हापूर : नवप्रवाह मराठी
शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या कल्पनेला व्यावसायिक स्वरूप देत उद्योजकतेची नवी वाट चोखाळणाऱ्या कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे. संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या तृतीय वर्षात शिकणारे निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांनी ‘श्रावणी नेक्सटेक’ या आयटी सेवा पुरविणाऱ्या स्टार्टअपची सुरुवात केली आहे.या स्टार्टअपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थीदशेतच व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
नवसंकल्पनेतून स्टार्टअपची संकल्पना
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निककडून विद्यार्थ्यांना नवसंकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेसाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. त्यातूनच निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांना स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना सुचली.
वडिलांच्या मित्रांना भेडसावणाऱ्या विविध आयटीविषयक गरजा लक्षात घेऊन दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय विकसित करण्यास सुरुवात केली. या संकल्पनेला प्रत्यक्ष व्यवसायाचे स्वरूप देत त्यांनी ‘श्रावणी नेक्सटेक’ची सुरुवात केली. आता त्यांना विविध प्रकल्पांची कामेही मिळू लागली आहेत.
वेबसाईटपासून AI आधारित सेवांपर्यंत
‘श्रावणी’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘ऐकणे आणि शिकणे’ असा होतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देणे, हे या स्टार्टअपचे वैशिष्ट्य आहे.‘श्रावणी नेक्सटेक’च्या माध्यमातून वेबसाईट डिझाइन, डिजिटल मार्केटिंग, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपाययोजना अशा विविध आयटी सेवा दिल्या जात आहेत.या कामासाठी २० हून अधिक आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जात असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थीदशेतच उद्योजकतेकडे वाटचाल
प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणातून घेतलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करून विद्यार्थी दशेतच स्टार्टअप सुरू करणे ही कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते भविष्यात सक्षम उद्योजक बनू शकतात.भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समाजोपयोगी सेवा आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्यावर भर देणार असल्याचे निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांनी सांगितले.
प्राध्यापकांचे मार्गदर्शन
या स्टार्टअपच्या उभारणीसाठी निखिल चव्हाण आणि सिद्धेश धुंदरे यांना प्राचार्य डॉ. महादेव नरके, संगणक विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी निखिल चव्हाण व सिद्धेश धुंदरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments